राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच सोलापुरातील व्यवहार ठप्प असल्याचं पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद आहेत.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या विरोधात आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने दुपारी दोन वाजेपर्यंत सोलापूर बंद पुकारला आहे. हा बंद शांततेत होईल. या बंदमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार असल्याचा दावा मंडळाचे उत्सव अध्यक्ष शेखर फंड यांनी केला आहे. दरम्यान आज सकाळपासून सुरु होणारे सोलापुरातील व्यवहार ठप्प असल्याचं पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद आहेत.
या सोलापूर बंदला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी, काँग्रेस यासह छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, प्रहार संघटना यांच्यासह विविध व्यापारी संघटनाचा या बंदला पाठिंबा आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना, भाजप, मनसे या पक्षांचा या बंदला विरोध आहे. दोन्ही बाजूच्या संघटना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस उपायुक्त विजय कबाडे, दीपाले काळे यांनी बोलावून घेतले होते. त्यांच्याकडून बंदचे नियोजन जाणून घेण्यात आले. बंद यशस्वी करण्यासाठी किंवा बंदला विरोध करण्यासाठी कोणत्याही नागरिक आणि व्यापाऱ्यांना बळजबरी करण्यात येऊ नये, अशा पद्धतीच्या सूचना कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस सतर्क असून शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 9 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 27 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 154 पोलीस अंमलदार, चार राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, 9 जलद प्रतिसाद टीम शहरातील बंदोबस्तामध्ये सहभागी आहेत. अशी माहिती सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.
शिवजन्मोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी सकाळी 9 वाजता सम्राट चौकात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होतील. सर्व कार्यकर्ते सुपर मार्केट येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करतील. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, चार हुतात्मा आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन रॅलीची समाप्ती होईल. शहरवासीयांनी दुपारी दोन वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यवहार बंद ठेवावेत, असे आवाहन शिवजन्मोत्सव मंडळाने केले आहे.
दरम्यान या सोलापूर बंदमध्ये भाजप, शिंदे गट आणि मनसे सहभागी होणार नाही. राजकीय द्वेषापोटीच्या सोलापूर बंदला आमचा पाठिंबा नाही, अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी माध्यमांना दिली. सोलापूर बंदची हाक ही महाविकास आघाडीची आहे त्यामुळे आमचा त्याला विरोध आहे. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या नावाचा वापर करुन महाविकास आघाडी राजकारण करत असल्याची टीका देखील जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी केली. तसेच सोलापुरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरु ठेवण्याचे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे..