अभिनेते अनुपम खेर यांनी आज ९ मार्च रोजी गुरुवारी पहाटे सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. ६६ वर्षीय सतीश कौशिक यांनी बुधवारी रात्री ८ मार्च रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. आता सतीश यांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. सतीश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त आहे आणि त्यावेळी ते दिल्ली, एनसीआरमध्ये होते. त्यांचा मृतदेह गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह मुंबईला आणण्यात येईल. सतीश कौशिक यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभरातील चाहते आणि इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
वृत्तानुसार, कौशिक गुरुग्राम येथे एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले होते आणि इथेच त्यांची प्रकृती खालावली. गाडीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले, पण झटका इतका मोठा होता की सतीश कौशिक यांचे प्राण वाचू शकले नाही.
दरम्यान, सतीश यांच्या पश्चात त्यांची पत्नी शशी कौशिक आणि त्यांची ११ वर्षांची मुलगी वंशिका आहे. वंशिकाचा जन्म २०१२ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून झाला होता. तत्पूर्वी, त्यांना एक मुलगादेखील होता. मात्र १९९६ मध्ये वयाच्या दुसऱ्या वर्षी त्याचं निधन झालं.