गायक सोनू निगम सध्या चर्चेत आहे. चेंबुरमधील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान सोनू निगमला धक्काबुक्की झाली होती. आता याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. सोनू निगमला धक्काबुक्की करणारा स्वप्नील फातर्फेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून तो कामानिमित्ताने बाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आमदार प्रकाश फातरपेकर यांचा मुलगा स्वप्नील फातरपेकर हा कामानिमित्ताने बाहेर गेल्याची माहिती आहे. सोनू निगम धक्काबुक्कीप्रकरणी चेंबूर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. चेंबूर पोलीस या प्रकरणातील तपास करत असून या प्रकरणातील सर्व तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम करत आहेत. चेंबूर पोलीस लवकरच त्याला चौकशीसाठी बोलावतील अशी माहिती आहे.”
चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले होते. दरम्यान आमदाराच्या मुलाने (स्वप्नील फातर्फेकर) सोनू निगमला धक्काबुक्की केली. सोनू स्टेजवरुन खाली उतरत असताना स्वप्नीलने त्याला जोरात खेचलं. सेल्फीसाठी स्वप्नीलने सोनूला धक्काबुक्की केली. त्यानंतर लगेचच सोनूने स्वप्नील विरोधात तक्रार दाखल केली असून सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पण आता स्वप्नील फातर्फेकर मुंबईबाहेर असल्याने पोलीस त्याची कधी चौकशी करतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.