वन्यप्राणी,पक्षी, वृक्ष यासह जैवविविधता तसेच पक्षी संरक्षण व संवर्धन कायद्याविषयी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच त्याबाबत जनजागृती वाढावी उद्देशाने 12 नोव्हेंबरपर्यंत पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने जिल्ह्यात वन विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी दिली.
अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली जन्मदिनापासून ते पक्षीतज्ञ पद्मभूषण डॉ. सलीम अली यांच्या जयंतीपर्यंत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. वन विभागाच्यावतीने अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस साजरा करून पक्षी सप्ताहाची सुरवात करण्यात आली. संगमेश्वर कॉलेज येथील विदयार्थी व शिक्षक यांच्या समवेत निसर्ग भ्रंमती करून विविध पक्ष्याविषयी माहिती देण्यात आली.
यावेळी अरण्यऋषी.मारूती चित्तमपल्ली, उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक बी. जी. हाके, वन्यजीव रक्षक निनाद शहा, वन्यजीव रक्षक भरत छेडा सिध्देश्वर प्रशालेचे हिरेमठ सर, प्रा. डॉ. एस. एम. दहिटणेकर, प्रा. पी. एस. अंदेरी, प्रा. एस. आर. जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी डी.पी खलाणे, WCAS चे अध्यक्ष अजित चव्हाण, अशासकीय संस्थेचे सदस्य संजय धाकपडे, शिक्षक कर्मचारी वृंद व विदयार्थी उपस्थित होते.
यावेळी अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली म्हणाले, नव्या पिढीतील पक्षी निरीक्षकांना पक्षी निरीक्षणाचा अभ्यास करत असताना त्याची टिपणी काढावी व त्याची नोंद डायरी मध्ये घ्यावी जेणे करून त्याचा सखोल अभ्यास करणे शक्य होईल व लेखन कौशल्य वाढू शकते. तसेच पक्ष्यांची व प्राण्यांची देखील एक वेगळी भाषा असते, ती समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असताना वानरांना दुष्काळाची चाहूल कशी लागते, विविध पक्ष्यांविषयी माहिती व त्यांच्या सवयीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विदयांर्थ्यांचे प्रश्नाचे समर्थन यावेळी अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली यांनी केले.
यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून पक्षी सप्ताह कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. माजी मानद वन्यजीव रक्षक पक्षी तज्ञ निनाद शहा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वनरक्षक ए. बी. सोनके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक वनसंरक्षक बी.जी हाके यांनी केले.