सोलापूर शहरातील जवळच असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात काल दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले त्यानंतर रात्री सोलापूर शहरात आठ वाजण्याच्या सुमारास विजापूर रोड परिसरातील काही भागात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
या पावसात आणि वादळाच्या वाऱ्यात संजय गांधी नंबर दोन झोपडपट्टी याठिकाणी असलेल्या अनेक घरांच्या छताचे पत्रे हवेत उडाले तर एक मोबाईल टॉवर तर चक्क स्लॅब मधील फाउंडेशन सह उखडून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
तर एका हॉटेलमध्ये भजी तळणाऱ्या महिलेच्या अंगावर दगड पडणार इतक्यातच त्या महिलेने पळ काढल्याने सुदैवाने त्या महिलेचा जीव वाचला. विशेष म्हणजे हे वादळी वारे केवळ विजापूर रोड, होडगी रोड परिसरात जाणवले परंतु मध्यवर्ती शहरात या वादळाचा इफेक्ट जाणवला नाही तसेच पाऊस हि पडला नाही.
या वादळामुळे सर्वाधिक नुकसान विजापूर रोड परिसरातील नागरिकांचे झाले असून घटनेची माहिती मिळताच मंगळवारी सकाळी 11 च्या दरम्यान आमदार प्रणिती शिंदे या ठिकाणी झालेल्या नुकसानग्रस्त लोकांच्या भेटीसाठी आल्या आणि त्यांनी नुकसान झालेल्या घरांची व दुकानांची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.