मार्च २०१६ मध्ये मंजूर झालेले सोलापूर शहरातील दोन उड्डाणपूल साडेसात वर्षानंतरही अजून भूसंपादनाच्याच टप्प्यावर अडकले आहेत. महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी त्यासंदर्भात बैठक घेतली. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे (एनएचआय) अधिकारी म्हणाले, जागा ताब्यात दिल्यावर लगेचच उड्डाणपूलाच्या कामाला सुरवात होईल. दरम्यान, दोन महिन्यात आता भूसंपादन पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांना या बैठकीत देण्यात आली.
सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी, भविष्यात शहरातील वाहतूक सुरळीत चालावी हा दूरदृष्टीकोन ठेवून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १०० कोटी रुपयांचे दोन उड्डाणपूल २६ मार्च २०१६ मध्येच मंजूर केले. त्यानंतर दोन-अडीच वर्षांत दोन्ही उड्डाणपूल होतील, अशी आशा होती. पण, साडेसात वर्षानंतरही पहिल्याच टप्प्यावर कार्यवाही असून अजून उड्डाणपूलासाठी एक वीट देखील चढलेली नाही.