नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांच्या निलंबनाची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत विधान परिषदेत दिली.
नेहमीच डॉ.शीतलकुमार जाधव यांची कार्यकिर्द वादग्रस्त राहिली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद स्थायी समिती सभा, जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेमध्ये डॉ.जाधव यांच्या कामकाजाचा पोस्टमार्टम होत होती. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अनेकवेळा होऊनही त्यांच्यावर ठोस कारवाई होत नव्हती.
विधिमंडळाच्या सभागृहात सोमवारी दि. 26 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील 22 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 68 उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबाबत सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी डॉ.जाधव यांच्यावरील निलंबन कारवाईची माहिती दिली.
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्राचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने नामंजूर झाला आहे. पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना बर्याचवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र परिपूर्ण प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही.
डॉ.शीतलकुमार जाधव हे पदाधिकारी व सदस्य, नागरिकांनी कार्यालयात भेटत नसल्याची अनेकांची तक्रार होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याही सूचनेला ते गांभीर्याने घेत नव्हते. अनेक वेळा डॉ.जाधव यांच्याकडील पदभार काढण्यासंदर्भात मागणी झाली होती. तरीही डॉ.जाधव यांच्या कामकाजात सुधारणा झाली नव्हती.