दोनशे खाटांचे जिल्हा रुग्णालय अद्याप रुग्णसेवेच्या प्रतीक्षेत आहे. इमारत बांधकाम पूर्ण होऊन आठ-दहा महिने झाले, पण फर्निचरच्या कामामुळे रुग्णालयाच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबला आहे. ह अर्धवट काम पूर्ण करून पदभरती व्हायला आणखी सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय पुढच्या वर्षीच रुग्ण सेवेत येईल, अशी सद्य:स्थिती आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीन उपजिल्हा, १४ ग्रामीण रुग्णालये व ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तसेच ४३१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे आहेत. मात्र, त्याठिकाणी केवळ प्राथमिक उपचारच होतात, अशी स्थिती आहे. खासगी रुग्णालयातील महागडा उपचार परवडत नसल्याने बहुतेक रुग्णांचा कल सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाकडेच आहे.महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेतून मोफत उपचार मिळतात, पण योजनेतील रुग्णालयांची संख्या अत्यल्प असल्यानेही रुग्ण ‘सर्वोपचार’मध्येच दाखल होतात.
महापालिकेच्या आरोग्य विभागाची स्थितीही अशीच आहे. ही गरज ओळखून जिल्ह्यासाठी १०० खाटा सर्व आजारांच्या रुग्णांसाठी तर १०० खाटा महिला व शिशुसाठी, असे २०० खाटांचे रुग्णालय सोलापुरात झाले. मात्र, पाच वर्षांत हे रुग्णालय पूर्ण होऊ शकले नाही, हे विशेष. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून जिल्हा रुग्णालय यावर्षीच सुरु होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.