राज्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांची विक्री वाढल्याने विजेची विक्री सप्टेंबर २०२२ मध्ये ४.५६ दशलक्ष युनिटवरून जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली आहे. दहा महिन्यात विजेची विक्री तिप्पट वाढली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात नऊ हजारांवर वाहने रस्त्यांवर धावत असून त्यात सहा हजार ७७८ दुचाकी आहेत.
पर्यावरण रक्षणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. महाराष्ट्रासाठी विद्युत वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी महावितरण नोडल एजन्सी आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी ‘महावितरण’च्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन उभारणे अथवा खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीस मदत करणे, विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी मदत करण्याच्या दृष्टिने मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करणे, विद्युत वाहनांसाठी धोरणात्मक निर्णयास सरकारला मदत करणे अशी विविध कामे केली जातात.