नीरा खोऱ्यातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणारे भाटघर धरण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ३८ दिवस उशिरा भरले आहे. यावरून खात्रीशीर पर्जन्यमान असलेल्या नीरा खोऱ्यातही यंदा पाऊस रुसल्याचे दिसून आले. २१ सप्टेंबर रोजी भाटघर धरण १०० टक्के भरल्यानंतर नीरा नदीला ३ हजार क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे वीर धरणातही पाणी वाढणार आहे.
नीरा नदीत पाणी सोडल्याने सोलापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील पंढरपूर, सांगोला व माळशिरस तालुक्यातील काही गावांना दिलासा मिळणार आहे.नीरा खोऱ्यात दरवर्षी हमखास पाऊस पडतो. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच नीरा खोऱ्यातील सर्व चारही धरणे शंभर टक्के भरून वाहण्याची परंपरा आहे. परंतु यंदा नीरा खोऱ्यातही पावसाने पाठ फिरवल्याने नीरा नदीवरील धरणे भरण्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नीरा देवघर धरण २० ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले परंतु पावसाने ओढ दिल्याने पुन्हा धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. भाटघर धरण मागील वर्षी १३ ऑगस्ट रोजी शंभर टक्के भरले होते. यंदा २१ सप्टेंबरची प्रतीक्षा करावी लागली. नीरा नदीवरील शेवटचे असलेले वीर धरण १०० टक्के भरले होते. सिंचनासाठी पाणी सोडल्याने धरणातील पाणी साठा ४४ टक्केपर्यंत खाली आला आहे. पावसाळ्याला आता जेमतेम २४ दिवस उरले आहेत. त्यामुळे उर्वरित काळात वीर धरण १०० टक्के होणार की नाही याकडे लक्ष लागले होते.