सोलापूर शहरात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या मक्तेदारांना काळ्या यादीत टाकून संबंधित खाते प्रमुख आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे केली. या मागणीसाठी त्यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी झोन कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले.
गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी जी कामे वार्डवाईज निधी तसेच लोकप्रतिनिधींच्या निधीतून झाली अशा कामांची तपासणी होऊन ज्या ठिकाणी नित्कृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. त्या संबंधित मक्तेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन मध्ये विविध योजनेतून भवानी पेठ, घोंगडे वस्ती, किरिटेश्वर मठ, मानवे नगर, हैनाळकर पट्टा तसेच इतरत्र ठिकाणी ड्रेनेज, रस्ते, पिण्याचे पाईपलाईन टाकणे व अन्य कामे सुरू आहेत. ही कामे निकृष्ट दर्जाचे होत असून संबंधित मक्तेदार, खाते प्रमुख आणि संबंधित अधिकारी यांचे संगनमत आहे असा आरोप करत यांच्यावर कारवाई होण्यासाठी गुरुवारी सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुदत्त चौक येथून प्रभागातील नागरिकांसह विभागीय कार्यालय क्रमांक तीन येथे जनआंदोलन करण्यात येणार होते. परंतु महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी संबंधित कामांचे पाहणी करून या परिसरातील निकृष्ट दर्जाच्या कामांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.