सोलापूर : सोलापुरातील तरुण कॉन्ट्रॅक्टरचे अपहरण करण्यात आल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली आहे. पुण्यातून आलेल्या सात महिलांनी तरुणाला बेदम मारहाण करून कारमधून पळवून नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश काळे (वय 28, रा. दक्षिण कसबा, सोलापूर) याचे आज दुपारी अपहरण करण्यात आले. ही घटना सात रस्ता परिसरातील डोमिनोज पिझ्झा परिसरात घडली. आकाश काळे हे सोलापुरात बांधकामासह इतर कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतात. आकाश काळे हे आपल्या कार्यालयातून बाहेर पडले. त्याचवेळी कारमधून आलेल्या महिलांनी आकाश काळे यांच्यासोबत हुज्जत घातली. मारहाण करत काही अंतरावर नेले. आणि मग त्यानंतर कारमध्ये कोंबले. होम मैदानाच्या दिशेने कार निघाली. त्याच परिसरात असलेल्या आकाशच्या मित्राने कारचा पाठलाग केला. बेगम पेठ पोलीस चौकी परिसरात कारला अडवले. कारची चावी काढून घेतली. आकाशचे अपहरण केलेल्या महिलांनी जोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली.
दरम्यान नागरिकांची गर्दी जमली. पोलीसही आले. पोलिसांनी आकाशसह सर्व महिलांना ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर महिलांनी पुन्हा एकदा गोंधळ घालायला सुरुवात केली.
या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पुण्यातून आलेल्या सात महिलांनी आकाशचे अपहरण का केले होते? याचा उलगड अद्याप झाला नाही. महिलांनी कोणत्या कारणासाठी मारहाण केली. अपहरण केले हे आकाशला सुद्धा कळाले नाही. अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी दिली आहे.


















