कामगार विमा रुग्णालयात सद्य:स्थितीत १०० खाटा उपलब्ध असून आता त्यात दहा आयसीयू बेड्सची भर पडणार आहे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर नेमले आहेत. हॉस्पिटलशी संलग्नित जवळपास ४५ हजार कामगारांची नोंदणी असून त्यांच्या कुटुंबीयांनाही येथे मोफत उपचार मिळतात. रुग्णालयात डासांच्या जाळ्या, पोषक आहार, पुस्तकपेटी, ऑक्सिजन व पुरेशी औषधे, अशा सुविधा आहेत.पण, हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन व एमआरआयची सुविधा नसल्याने विमा रुग्णालयाने यशोधरा हॉस्पिटलशी टायअप केले आहे. त्यामुळे आता डायलिसिस, कर्करोग, मेंदू, किडनी अशा आजारांच्या रुग्णांची सोय झाली आहे.
तसेच विमा रुग्णालयातील रुग्णाला औषधे किंवा अन्य कशासाठीही पदरमोड करावी लागत नाही, हे विशेष. सोनोग्राफी, एक्स-रे, इकोची सोय रुग्णालयातच असून प्रसूती, सिजिरियनसह तातडीच्या शस्त्रक्रिया रुग्णालयातच होतात. आयुक्त डॉ. महेश वरुडकर, डॉ. अलंकार खानविलकर व डॉ. शशी कोळनूरकर यांच्या मादर्शनाखाली रुग्णालयाची वाटचाल सुरु आहे.