मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवरा अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर निदर्शने केली.संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत आणि कार्यकर्ते अचानक आमदार विजयकुमार देशमुख यांच्या डफरीन चौक भागातील घरासमोर ठिय्या मारला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, आमदार देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.
राऊत म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे. केवळ सोलापुरात आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते जरांगे यांना विरोध करीत आहेत. हा विरोध आम्ही खपवून घेणार नाही. देशमुख यांनी कार्यकर्त्यांना न आवरल्यास त्यांना घराबाहेर पडणे मुश्किल होईल, असा इशारा राऊत आणि कार्यकर्त्यांनी दिला. पोलिसांनी काही वेळातच ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.