सोलापूरचे ग्रामदैवत तसेच कर्नाटक आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील सिद्धरामेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील पवित्र श्रावणमासानिमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी आणि श्रावणमास उत्सव समितीच्या वतीने गुरुवार (ता. १७) ऑगस्ट पासून ते शनिवार (ता.१६) सप्टेंबर या दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, श्रावणाच्या पार्श्वभूमीवर, येथील मंदिर व परिसरात संपूर्ण तयारी झाली असून आता केवळ भाविकांची आगमनाची प्रतीक्षा आहे.
श्रावणमासानिमित्त दररोज श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून सिद्धेश्वर मंदिरात महिला व पुरुष भक्तांसाठी दर्शन रांगेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांसाठी श्रावणी सोमवार निमित्त प्रत्यक्ष श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेता येणार नाही, अशा भक्तांसाठी प्रत्येक सोमवारी डिजिटल स्क्रिनद्वारे श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनाची सोय केलेली आहे. दररोज पहाटे गाभाऱ्यातील श्री सिध्दरामेश्वरांच्या आरतीचे थेट प्रक्षेपण सकाळी १०:३० वा. केले जाणार आहे.