राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे यांनी शनिवारी (ता. १८ मार्च) पहाटे दोन वाजेच्या सुमारास त्यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार सोलापूर- विजापूर हायवे रोडवर सापळा लावला असता नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) हद्दीत एक बोलेरो जीप रस्त्यावरुन येताना दिसली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन त्यास अडवून तपासणी केली असता त्यामध्ये दोन इसम मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून जीपची झडती घेतली असता जीपमध्ये हातभट्टी दारुने भरलेल्या ८ रबरी ट्युब मिळून आल्या. वाहनातील दोन्ही इसमांना अटक करुन सदर वाहन व हातभट्टी दारु जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईत बोलेरो जीप क्र. MH-13-AQ-0197 हे वाहन जप्त करुन वाहनातील मोठ्या रबरी ट्युबमध्ये १०० लिटरप्रमाणे ८०० लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली आहे. जप्त हातभट्टीची वाहतूक करणारे इसम नामे अमोल भोजु पवार व श्रीनाथ सुरेश राठोड रा. दोघेही मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर यांना अटक करुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा,१९४९अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत ८०० लिटर हातभट्टी दारु व वाहन असा एकूण रु. ६ लाख चाळीस हजार आठशे किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त पुणे विभाग मोहन वर्दे व अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरिक्षक ब-२ विभाग अंकुश आवताडे, सहायक दुय्यम निरिक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे व प्रशांत इंगोले यांनी पार पाडली.