रेल्वे विभागाचा महत्वकांक्षी प्रकल्प वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग ताशी १८० किमी आहे. ॲक्सलरेशन १२९ सेकंदात १६० किमी वेग आहे. या एक्स्प्रेसला कवच नावाची अत्याधुनिक यंत्रणा आहे. त्यामुळे एकाच ट्रॅकवर समोरासमोर गाड्या आल्यास तीन किलोमीटर अगोदरच समजते आणि गाडीला ब्रेक लावला जातो. त्यामुळे अपघात टाळता येतो, अशी यंत्रणा ‘वंदे भारतमध्ये कार्यान्वित केलेली आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्यात आणि इंजिनसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गाडीतील स्वच्छतागृहांचा वापर सर्वसामान्यांसह दिव्यांग प्रवाशांनाही सहजपणे करता येईल, अशी त्याची रचना करण्यात आली आहे. स्वच्छतेला प्राधान्य हे वंदे भारतचे प्रमुख वैशिष्ट आहे. दरम्यान, १० फेब्रुवारीला सोलापूर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी पुण्याकडे रवाना होईल.
पहिल्या दिवशी पुण्यापर्यंत गाडी धावणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पुढील आदेशानुसार रेल्वे सोलापूर-पुणे-मुंबई अशी धावेल. दरम्यान, या गाडीचा ताशी वेग १८० किमी असला, तरीदेखील सोलापूर-पुणे-मुंबई या मार्गावर १२० किमी वेगानेच वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. इतर रेल्वे गाड्यांच्या तुलनेत वंदे भारतच्या तिकिटाचा दर जास्त आहे.परंतु प्रवाशांसाठी सुविधा अधिक आहेत.
सोलापूर-मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला १० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतून हिरवा झेंडा दाखवतील. त्यासाठी रेक बुधवारी सकाळी चेन्नईहून मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाली. सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी ही गाडी पुण्याच्या दिशेने गेली.
मुंबईसाठी तेराशे ते २३६५ रुपयांचे तिकीटसोलापूर ते पुण्यापर्यंत २६२ किलोमीटरच्या अंतरासाठी ‘वंदे भारत’ला एक्झिक्युटिव्ह डब्यातील प्रवासाला एक हजार ५१० रुपयांचा तिकीट दर आहे. तर चेअर कारमधील प्रवासाला पुण्यापर्यंत ७७५ रुपये मोजावे लागतील. सोलापूर-मुंबई हा ४५३ किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एक्झिक्युटिव्ह डब्यासाठी दोन हजार ३६५ रुपये तर चेअर कारसाठी तेराशे रुपये द्यावे लागतील.