राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता जिल्ह्यात हातभट्टीमुक्त गावांची मोहीम हाती घेतली आहे. याअनुषंगाने ५४ गावांमधील हातभट्टी गाळणाऱ्या १२८ ठिकाणांवर वॉच ठेवला आहे. आठवड्यातून दोन-तीनवेळा छापेमारी करून तेथील मुद्देमाल नष्ट केला जात आहे.
हातभट्टी गावात सहजपणे उपलब्ध होत असल्याने अनेक तरुण त्याच्या आहारी गेले. त्यामुळे नवविवाहितांच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले आहे. चिमुकल्यांना समजायच्यापूर्वीच त्यांच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला, अशी चिंताजनक वस्तुस्थिती अनेक गावांमध्ये आहे. दुसरीकडे दारूच्या व्यसनातून गावांमध्ये वादविवाद, भांडणे देखील वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हातभट्टीमुक्त गाव अभियान राज्यभरात सुरू केले आहे. त्याची अंमलबजावणी सोलापूरचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
ग्रामीण पोलिसांच्या मदतीने अवैध हातभट्ट्यांवर छापे टाकले जात आहेत. १ जानेवारी ते १७ ऑगस्टपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातून तब्बल ५० हजार लिटर हातभट्टी जप्त केली आहे. तसेच सहा लाख लिटर गुळमिश्रित रसायनासह चार कोटींचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.