अहमदनगरमध्ये एका मिरवणूकीत औरंगजेबाचे फोटो झळकावल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता कोल्हापूरमध्ये काही तरुणांनी औरंगजेबाचे फोटो स्टेट्स म्हणून ठेवले. यावरुन वाद सुरु झाला असून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
अहमदनगरपाठोपाठ आता कोल्हापुरातही औरंगजेबाच्या फोटोवरून राडा झालाय. शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं ही वादाची ठिणगी पेटली. त्यावरून आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापुरातील दसरा चौक, टाऊन हॉटल, लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक केली. शिवाय आक्रमक हिंदुत्ववादी संघटनांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलनही केलं. या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी सात जून रोजी कोल्हापूर बंदची हाक दिलीय.
नगरमध्ये फोटो झळकला
त्याआधी काल अहमदनगरमध्ये उरुसनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत काही तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकावला होता. नगरमधल्या फकीरवाडा परिसरात हजरत दंबाहरी हजरत यांच्या उरुस निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरणूकीत काही तरुण हातात औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं. याप्रकरणी पोलिसांनी पोस्टर झळकावणाऱ्या चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे तरुणांनी डिजेच्या तालावर नाचताना हातात औरंगजेबाचा फोटो घेतला होता. तसंच ‘बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है’ अशा घोषणाही दिल्या जात होत्या.