उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत स्वच्छ मुख अभियानासाठी SMILE AMBASSADOR म्हणून भारतरत्न श्री.सचिन तेंडुलकरची नियुक्ती करण्यासंदर्भात आज (30 मे) सामंजस्य करार करण्यात आला आहे. स्वच्छ मुख अभियान हे एक ओरल हेल्थ मिशन आहे. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत हा उपक्रम पुढील 5 वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा सचिन हा सदिच्छा दूत झाला आहे.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानाचा ‘स्माईल अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि सचिन तेंडूलकरनं आज स्वच्छ मुख अभियानासाठी सामंजस्य करार केला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले,”आमचे वैद्यकीय शिक्षण विभाग हे स्वच्छ मुख अभियान राबवत आहेत. हे अभियान तोंडाच्या आरोग्यासंबंधित आहे. सचिन तेंडुलकर आणि स्वच्छ मुख अभियान, महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये आज सामंजस्य करार झाला आहे. अनेक मोठे सेलिब्रिटी कर्करोगास कारणीभूत असणाऱ्या तंबाखूच्या जाहिराती करतात. सचिन यांनी अशा कोणत्याही जाहिरातीमध्ये काम केलं नाही. तरुणांमध्ये जनजागृती करण्याचे त्यांनी ठरवले आहे.”
स्वच्छ मुख अभियानाचा ‘स्माईल अॅम्बेसेडर’ झाल्यानंतर सचिननं सांगितलं की, ‘माझ्या वडिलांना मी वचन दिलं होतं की तंबाखूच्या जाहिरातीमध्ये कधीच काम करणार नाही. मला तंबाखू कंपनीनं ऑफर्स पण दिल्या होत्या पण आज मी अभिमानानं सांगू शकतो की, आतापर्यंत तंबाखू कंपनीसोबत मी कोणताही व्यवहार केला नाहीये. ‘
स्वच्छ मुख अभियान म्हणजेच SMA ही ओरल हेल्थ आणि मुख स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल भारतीयांना शिक्षित करण्यासाठीची भारतीय डेंटल संघटनेनं (IDA) राबवलेली एक राष्ट्रीय मोहीम आहे. ही मोहीम केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात राबवण्यात येणार आहे.