भारतीय हवाई दलात लवकरच नवीन 12 सुखोई विमाने सहभागी होणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने सुखोई 30 एमकेआय विमानांच्या खरेदीस मंजुरी दिली आहे. ही सर्व विमाने मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे तयार केली जातील.
यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण 11 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात विमाने आणि संबंधित ग्राऊंड सिस्टीमचा समावेश असले. ही विमाने भारतातच तयार होणार असून हे एक मोठे पाऊल असले. विमानात आवश्यकतेनुसार साहित्याचा समावेश असेल. सुखोई 30-एमकेआय लढाऊ विमाने गेल्या अनेक वर्षांत अपघातांचे बळी ठरलेल्या 12 विमानांची जागा घेतील. हे एक मल्टीरोल लढाऊ विमान आहे. यामध्ये एकाच वेळी हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत युद्ध लढण्याची क्षमता आहे.
डिफेन्स अॅक्विझिशन कॉऊन्सिलने अंदाजे 45 हजार कोटी रुपयांच्या 9 भांडवली अधिग्रहण प्रस्तावांसाठी स्वीकृती आवश्यकता मंजूर केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज, शुक्रवारी 15 सप्टेंबर रोजी ही बैठक झाली. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, या सर्व खरेदी भारतीय विक्रेत्यांकडून प्रोक्योरमेंट श्रेणी अंतर्गत केल्या जातील, जे ‘आत्मनिर्भर भारत’चे ध्येय साध्य करण्यासाठी भारतीय संरक्षण क्षेत्राला योगदान देईल. उद्योगाला भरीव चालना मिळेल.