बेळगाव / कोल्हापूर – देशाच्या इतिहासात प्रदीर्घ चाललेला लढा अशी नोंद बेळगावच्या सीमालढ्याची झाली आहे. आपल्या स्वाभिमानी बाण्याने बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक मराठी अस्मितेची परंपरा अखंडपणे चालवीत आहेत.सीमा प्रश्नाच्या लढ्यात अनेक पिढ्या खर्ची पडल्या आहेत. आजही नव्या जोमाने तरुण पिढी सीमालढ्यात सहभागी होत आहे. मात्र महाराष्ट्र सरकार एक नोव्हेंबर काळा दिनाचे केवळ सोपस्कार पाडत आहे, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना सीमा प्रश्नाचा विसर पडला आहे का ? अशी भीती वाटत आहे.अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी बेळगाव आयोजित करण्यात आलेल्या एक नोव्हेंबर काळा दिनाच्या जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली.
मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या व्यासपीठावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर,माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे आदी मान्यवर उपस्थित होते. खचाखच भरलेल्या मराठा मंदिर सभेतील कार्यकर्त्यांना उद्देशून पुढे बोलताना के.पी. पाटील म्हणाले, इतिहासाला जागत बेळगाव सीमा भागातील तरुण पिढी सीमा प्रश्नाच्या लढ्यात सहभागी होत आहे. आम्हीच खरे लढवय्ये असल्याचे बेळगाव सीभाभागातील मराठी भाषिकांनी सिद्ध करून दाखविले आहे. मात्र मराठ्यांना दुहीचा शाप लाभला आहे. याचा प्रत्यय सीमा प्रश्नाच्या लढ्यात हे पाहायला मिळतो. आमचा खरा शत्रू कोण हे आपण विसरलो आहोत. याचे आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.
छत्रपती शिवरायांचा स्वप्न साकारण्यासाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाला अनुसरून सर्वांनी आपसातील मतभेद गाडून एकत्र येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रानेही सीमा प्रश्नाच्या लढ्यात आक्रमक भूमिका घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील गावोगावी, शहरा शहरात काळा दिन गांभीर्याने पाळणे आवश्यक आहे. सीमा प्रश्नाच्या लढ्याला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र पेटून उभा राहिला पाहिजे. तरच हा प्रश्न सुटेल, असा विश्वासही के पी पाटील यांनी व्यक्त केला.