28 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजून 36 मिनिटांपासून निरभ्र आकाशात एका सरळ रेषेत पाच ग्रह आले. युरेनस, मंगळ, बुध,गूरु, शुक्र, हे पाच ग्रह चंद्राजवळ एका सरळ रेषेत टेलीस्कोपच्या साह्याने पाहाता येणार होते. जिजामाता नगर, मारोती मंदिर परिसरात असलेल्या नितीन मोरे यांच्या ‘रामपुष्प’ सदनच्या छतावर संध्याकाळी 7 वाजल्यापासूनच खगोलशास्त्राबद्दल आवड आणि जिज्ञासा असणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांनी गर्दी केली.
विज्ञानचे शिक्षक नितीन मोरे यांनी टेलीस्कोपच्या साह्याने विज्ञाननिष्ठ विद्यार्थी, लहान मुला मुलींना निरभ्र आकाशात आजच्या दिवशी घडणारी खगोलीय घटना ज्यात चंद्राच्या जवळ सरळ रेषेत आलेल्या युरेनस, मंगळ, बुध,गूरु,शुक्र ह्या पाच ग्रहांना मोबाईल ॲप आणि टेलीस्कोपच्या साहाय्याने दाखवून त्यासंदर्भात शास्त्रीय माहिती दिली.
यावेळी टेलीस्कोपच्या साह्याने मुलांनी हे ग्रह प्रत्यक्ष अनुभवले. ज्यामुळे त्यांची खगोशास्त्राबद्दलची जाणीवजागृती वाढली आणि त्यांना असणाऱ्या शंकांचे निरसन देखील करण्यात आले. यापूर्वीही गेल्या अकरा वर्षांपासून नितीन मोरे सरांनी बालभवन विज्ञान केंद्र हिंगोलीच्या माध्यमातून विज्ञान आणि खगोलशास्त्राचा प्रचारप्रसार केला आहे.
सध्या ते बाल भवन येथे कार्यरत नाहीत तरी विज्ञान प्रचारप्रसाराचे कार्य अशा उपक्रमातून सातत्याने करत आहेत. आदित्य विठ्ठल गवळी या 4थ्या वर्गातील विद्यार्थ्याने जमलेल्या सर्वाँना सूर्यमालेली ईत्यंभुत माहिती दिली तर विठ्ठल गवळी यांनी टेलीस्कोपद्वारे सर्व ग्रहांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यासाठी मदत केली.
याप्रसंगी कल्पना मोरे, प्रशीका मुनेश्वर, सुनील मुनेश्र्वर,आदित्य गवळी, प्रा. ज्योतीपाल खडसे, नारायण शिंदे, गजानन टाले, पांडुरंग बोंडे, वाशिम येथून प्रभाकर टाले, राजू बोंडे आले होते.