डोंबिवली: साधारण वर्षभरापूर्वी डोंबिवलीत पांढरा कावळा आढळून आला होता. त्यानंतर आता शहरात चक्क पिवळा रंगाचा पोपट आढळून आला आहे. आता तुम्ही यात काय नवीन आहे? असा प्रश्न कराल. पण हा लव्हबर्ड किंवा परदेशी पोपट नाहीतर आपल्या देशातील रोझ रिंग पॅराकीट प्रजातीतील आहे. रोझ रिंग पॅरट म्हणजे हिरवा रंगाचा आणि लाल चोच असलेला पोपट. आपण हे पोपट नेहमीच पाहतो. मात्र आज आढळलेल्या पोपटाचा रंग चक्क पिवळा आहे.
वाढत्या शहरीकरणाच्या ओघात विरळ होत चाललेल्या वनराईतील डेरेदार वृक्ष नष्ट झाल्याने पोपटांचे आसरे नाहीसे झाले. परिणामी लाल चोचीच्या गावरान पोपटाचे मनोहारी दर्शन अलीकडच्या काळात दुरापास्त झाल्याचे चित्र आहे. झपाट्याने होणाऱ्या नैसर्गिक बदलांचे हे द्योतक पक्षीमित्रांसाठी चिंतेचा विषय ठरत असताना महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या पत्रकार कक्षाच्या खिडकीत सोमवारी सकाळी एक पूर्ण पिवळ्या रंगाचा पोपट आढळून आला. हा पोपट घाबरून खिडकीच्या जाळीवर आला होता. प्राणी-पक्षी मित्र आणि पॉझ संस्थेचे निलेश भणगे यांना पोपटाची माहिती देण्यात दिली आणि त्यांनी तात्काळ पोपटाची सुटका करत त्याला ताब्यात घेतले.
प्राणी-पक्षी मित्र आणि पॉझ संस्थेचे निलेश भणगे यांनी सांगितले की ठाणे जिल्ह्यात असा रंग बदललेला पोपट प्रथमच आढळून आलेला आहे. सदर पोपटाची पूर्ण वाढ झालेली असून ती मादी आहे. भारतीय प्रजातीचाच हा पोपट असून फक्त तो दुर्मीळ अशा पिवळ्या रंगात आढळून आला आहे. रंग परिवर्तन झाल्याने रोझ रिंग पॅरट पिवळ्या किंवा निळ्या रंगाचे झाल्याच्या काही नोंदी भारतात आहेत. या पोपटास वन विभागाच्या ताब्यात दिले जाणार आहे.