अणदूरचे (जि. उस्मानाबाद) प्रसिद्ध समाजसेवक, हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचे पुण्यात निधन झाले. त्यांना कर्करोग झाला होता. त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर उद्या, बुधवारी अणदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. अहंकारी यांच्या निधनाने एक समाजसेवक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
डॉ. शशिकांत अहंकारी यांचे मूळ गाव खुदावाडी आहे. तिथून जवळ असलेल्या अणदूरमध्ये डॉ. अहंकारी आपल्या पत्नी डॉ. शुभांगी अहंकारी यांच्यासोबत १९९३ मध्ये हॅलो मेडिकल फाऊंडेशनची स्थापना केली होती. या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांना हे दाम्पत्य आरोग्यसेवा देत होते. डॉ. अहंकारी यांनी ४०० पेक्षा अधिक ग्राम आरोग्य कर्मचार्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशिक्षित केले आहे. तळागाळातील, दुर्गम भागातील लोकांना अधिक प्रभावी आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळावी, यासाठी डॉ. अहंकारी यांनी शहरातील डॉक्टर म्हणून फायदेशीर कारकीर्द सोडण्याचा निर्णय घेतला होता. या फाऊंडेशनचे काम पूर्व महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांत प्रभावीपणे सुरू होते. डॉ. अहंकारी यांच्या हॅलो मेडिकल फाऊंडेशनकडून अनेक अतिरिक्त सेवा दिल्या जातात. ज्यात दुय्यम-केअर हॉस्पिटल, आरोग्य विमा, स्वयं-सहायता गट, महिला सक्षमीकरण मंच, शाश्वत शेती आणि विज्ञान शिक्षण इत्यादीचा समावेश आहे.
त्यांच्या या अतुलनीय कामामुळे डॉ. अहंकारी यांची राज्यस्तरीय चार समित्यांचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आतापर्यंत पंधरा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला असून हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे कार्य सादर केले आहे. याशिवाय, डॉ. अहंकारी आणि हॅलो मेडिकल फाऊंडेशनने महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या सर्वोत्कृष्ट एनजीओसाठी महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.