पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर (भारजवाडी) या ठिकाणी बारा वर्षांपूर्वी लहू विक्रम बोराटे हे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. यावेळी या शाळेचा पट २० इतका होता. ही शाळा ऊसतोड मजूर कामगारांच्या मुलांची शाळा म्हणून ओळखली जात होती. आज या शाळेमध्ये ५४ विद्यार्थी शिकतात.
लहू बोराटे हे फेब्रुवारी २०११ मध्ये शाळेत रुजू झाले. त्यानंतर तब्बल बारा वर्षे त्यांनी या शाळेमध्ये आपली शिक्षक सेवा पूर्ण केली आणि त्यांची १८ मे २०२३ ला हनुमाननगर शाळेमधून बदली झाली. ते नव्याने धनगर वस्ती तालुका जामखेड या ठिकाणी रुजू झाले. आपल्या बारा वर्षांच्या शिक्षक सेवेमध्ये त्यांनी शाळेचा पूर्ण कायापालट करून विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शाळा, हस्ताक्षर स्पर्धा, हरित शाळा, तसेच शाळेला 3d पेंटिंग करून त्यामध्ये पाळीव प्राणी, हिंस्र प्राणी तसेच विविध पक्षी व मुळाक्षरे काढलेली आहेत. यातून विद्यार्थ्यांना खेळतानाही शिक्षण मिळावे, अशी अनोखी संकल्पना त्यांनी शाळेमध्ये राबवली. गावातले तरुण, पालक, आजी-आजोबांच्या भरवशावर मुलांना घरी ठेवून ऊसतोड कामगार गाव सोडून जात होते. तेव्हा लहू सर हेच त्यांचे पालक असायचे.
शाळेने फक्त तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये खूप वेळा आपले आणि आपल्या विद्यार्थ्यांचे नाव कमावले आहे. या शाळेमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाले आहेत. तर विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर असेल, कुठली क्रीडा स्पर्धा असेल, अभ्यास असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुलांनी चांगल्या प्रकारची कामगिरी करत राज्यात आणि जिल्ह्यात अनेक बक्षीसही मिळवले आहेत. हे झालं बोराटे गुरुजींमुळे.
बोराटे सरांना निरोप देण्यात आला. यासाठी पालक, आजी-माजी विद्यार्थी व बालानंद परिवार यांनी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पालक, माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, तसेच प्रदूषण आयुक्त दिलीपजी खेडकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रत्येकाचे अंत:करण कार्यक्रमादरम्यान भरून आले होते. विद्यार्थ्यांचा आणि पालकांच्या भावनांचा महापूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एका प्राथमिक शिक्षकावर ग्रामस्थ इतकं प्रेम करू शकतात यावर विश्वास बसत नाही. गेल्या बारा वर्षांमध्ये या शिक्षकाने निस्वार्थपणे दिवस-रात्र एक करत वेळेचे भान न ठेवता या शाळेसाठी आणि तेथील मुलांसाठी एक प्रेरणास्थान, एक आदर्श शिक्षक म्हणून एक गुरु म्हणून अनेकांना मार्गदर्शन केले. आणि म्हणूनच येथील सर्व पालक, तरुण आणि चिमुकले मुल त्यांच्यावर अपार प्रेम करतात. आजपर्यंत एका शिक्षकाचा असा सत्कार कुणी केला नसेल असा या हनुमाननगर वस्तीवरील भारजवडी गावातील ग्रामस्थांनी या शिक्षकांना निरोप दिला.
निरोप देताना सर्वच पालकांच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः पाण्याच्या धारा वाहत होत्या. चिमुकली रडत होती. तर सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी, तरुण वर्ग आणि या परिसरातील सर्वच लोकांनी फुलांचा वर्षाव करत या शिक्षकांना निरोप दिला. आजपर्यंत अशा प्रकारचा निरोप एकही शिक्षकाला कधीच भेटला नसेल. प्रत्येक शिक्षकाचे स्वप्न असेल की मलाही अशाच प्रकारचा निरोप भेटायला पाहिजे…. असा निरोप लहू बोराटे सरांना आणि जपकर सरांना हनुमाननगर भारजवाडी या ग्रामस्थांनी दिला.