सन २०२३-२४चा अर्थसंकल्प आज, बुधवारी संसदेत सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेटमधून सर्वसमान्यांना दिलाला देण्याचा प्रयत्न केला आहे. तर, महिलांसाठीही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी स्वतंत्र्याच्या अमृतकाळात महिलांसाठी नवी बचत योजना सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. दोन वर्षांसाठी या योजनांचा लाभ घेता येईल.
निर्मला सीतारमण यांनी बजेटमधून महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी ८१ लाख महिला बचतगटांचे सबलीकरण करण्यात येणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन योजना आखण्यात येत आहेत, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे
महिला सन्मान बचत पत्र, अशी ही योजना असून या दोन वर्षासाठी या योजनांचा लाभ घेता महिलांना घेता येईल. याचा कालावधी मार्च २०२५ मध्ये पूर्ण होईल. म्हणजेच, मार्च २०२५ पर्यंत महिला २ लाख रुपयांपर्यंतच्या बचतवर ७.५ टक्के इतके व्याज वर्षाला दिले जाईल. दोन वर्षाच्या काळात गरज लागली तर यातील थोडी रक्कम काढून घेता येईल.
दरम्यान, आर्थिक वर्ष २०२३-२४साठी सादर होणारा हा अर्थसंकल्प हा सीतारामन यांचा सलग पाचवा पूर्ण अर्थसंकल्प आहे. तसंच, निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प मांडणाऱ्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. तसंच, हा निवडणुकीपूर्वीचा विद्यमान मोदी सरकारचा हा शेवटचा केंद्रीय अर्थसंकल्प असणार आहे.