चेहऱ्यावर मुखवटा घातलेल्या चोरट्यांनी दागिन्यांच्या शोरूममधून फक्त ३८ सेकंदात तब्बल १६ कोटी रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. चोरट्यांनी प्लानिंग करत हातोड्यासह दुकानात प्रवेश केला. या चोरट्यांनी दुकानात घुसून तेथील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संपूर्ण दुकान लुटलं. ८ जानेवारीला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील पार्क स्लोप परिसरात ही घटना घडली.
चेहऱ्यावर मुखवटा, हातात हातोडा
मुखवटा घातलेले तीन चोरटे हातात हातोडा घेऊन शोरूममध्ये प्रवेश करतात. तिथे डिस्प्लेमध्ये ठेवण्यात आलेले दागिने लुटण्यासाठी काचा फोडतात. तसेच, येथे उपस्थित लोकांना जीवे मारण्याची धमकीही देतात. दुकानाच्या मालकीण इरिना सुले यांनी ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला याबाबत माहिती देताना सांगितले, ही घटना अत्यंत भीतीदायक होती.
अवघ्या ३८ सेकंदात ही घटना घडली. त्यांनी दुकानातून जवळपास १०० अंगठ्या आणि इतर दागिने लुटले. या दागिन्यांची किंमत सुमारे १६ कोटी रुपये आहे. त्यांना माहिती होते की त्यांना दागिन्यांचे कोणते बॉक्स उचलायचे आहेत. त्यांनी चोरी करताना फक्त मोठे बॉक्स घेतले, असंही इरिनाने सांगितले.
मुखवटा घातलेले चोर जेव्हा शोरूममध्ये घुसले तेव्हा इरिना या एका ग्राहकाला दागिने दाखवत होत्या. हे चोरटे हातात हातोडा घेऊन दुकानात घुसले, त्यानंतर त्यांनी हातोड्याने डिस्प्ले तोडण्यास सुरुवात केली. तेव्हा एका कर्मचाऱ्याने फोन काढून इरिनाला देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापैकी एका चोरट्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर ते दागिने घेऊन पळून गेले, असं इरिना यांनी सांगितलं. सुदैवाने या चोरीच्या घटनेत कोणाला दुखापत झालेली नाही.