छत्रपती संभाजीनगर : शेंद्राच्या पंचतारांकित एमआयडीसी परिसरात ‘फ्लायर रिन्युएबल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’तर्फे १०० कोटींची मोठी गुंतवणूक होत असून पुढील सहा महिन्यांत उत्पादन सुरू होणार आहे. कंपनीचे संचालक अविनाश वायाळ यांनी चीनमधील China Tian New Energy (Hubei) Co. Ltd. या कंपनीसोबत सोलार उत्पादन व ई-चार्जिंग क्षेत्रातील दोन महत्त्वपूर्ण करार केले आहेत.
या करारानुसार शेंद्र्यात ७०० किलोवॅट क्षमतेचे सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारले जाणार असून, येथे २५० मेगावॅट उत्पादनक्षमता असलेले ‘फ्लायर सोलर’ नावाचे पॅनल तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी ५० कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे.
याशिवाय, कंपनीकडून फ्लायर ईव्ही चार्जिंग स्टेशन या नावाने राज्यातील तसेच राष्ट्रीय महामार्गांवर विस्तृत नेटवर्क उभारण्यात येणार असून त्यासाठी अतिरिक्त ५० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, इतर चार्जिंग स्टेशनच्या तुलनेत येथे वाहनचालकांना प्रति चार्जिंग सत्रात शंभर रुपयांपर्यंत बचत होणार आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.
२०२५–२०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगराला नवी ऊर्जा तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून ओळख मिळवून देणारा हा प्रकल्प औद्योगिक वाढीस चालना देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



















