बार्शी – पोकलेन मशीन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून बार्शीतील व्यापाऱ्याची तब्बल १२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत बार्शी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विठ्ठल दामोदर आहेर, पाण्याच्या बाटलीचा व्यापार, रा. उपळाई रोड, बार्शी, सध्या रा. घाटकोपर, मुंबई) यांनी बार्शीतील अश्विनकुमार श्रीधर भिल्ल (रा. सुभाषनगर, बार्शी) याच्याविरुद्ध ही तक्रार दिली आहे.
सन २०२० मध्ये आहेर यांची ओळख त्यांचे साडूचा मुलगा आकाश बारंगुळे यांच्या माध्यमातून अश्विनकुमार भिल्ल याच्याशी झाली. त्यावेळी भिल्ल याने पोकलेन मशीनच्या व्यवसायात मोठा नफा मिळतो, असे सांगून आहेर यांना भागीदारीत व्यावसाय करण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार दोघांमध्ये व्यवहार ठरला आणि मशीन खरेदीसाठी डाउनपेमेंट म्हणून आहेर यांनी आरटीजीएसद्वारे ५ लाख ५५ हजार रुपये तसेच रोख ६ लाख रुपये अश्विनकुमार भिल्ल याला दिले.
भिल्ल याने मशीन बुलढाणा जिल्ह्यातील पलोड एंटरप्रायजेसकडून खरेदी केल्याचे सांगितले. मात्र तीन महिने उलटूनही मशीन मिळाले नाही. त्यानंतर आहेर व त्यांच्या नातेवाईकांनी प्रत्यक्ष बुलढाणा व नंतर नागपूर येथे जाऊन चौकशी केली असता पोकलेन मशीन अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले.
पैसे परत मागितल्यावर भिल्ल याने पाच कोरे चेक देऊन दोन महिन्यात पैसे देतो, असे आश्वासन दिले. मात्र दिलेल्या चेकपैकी एक चेक (रक्कम रुपये ३,८०,०००) दोन वेळा बँकेत भरला असता तो निधीअभावी परत आला. त्यामुळे भिल्ल याने फसवणूक केल्याची खात्री पटल्याने आहेर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणी अश्विनकुमार श्रीधर भिल्ल (रा. सुभाषनगर, बार्शी) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.