सोलापूर : जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील १५० पेक्षा अधिक महिला कर्मचारी ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा लाभ घेत असल्याची नावे शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवली आहेत. महिला व बालकल्याण विभागाने ही नावे प्रशासन विभागाला पाठविली आहे. त्यानुसार प्रशासन विभागाकडून यादीतील महिलांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर त्या महिला कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गरीब व सामान्य कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीमुळे प्रत्येक अर्जदार महिलेला या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यानंतर या योजनेतील बोगस लाभार्थी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील महिला कर्मचारीही बोगस लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात १० लाखांपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असून, त्याची यादी शासनाने महिला व बालकल्याण विभागाला पाठविली आहे. त्या विभागाने प्रशासन विभागास यादी पाठवून या कर्मचाऱ्यांची पडताळणी करुन माहिती पाठविण्यास सांगण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेतील विविध विभागात कार्यरत असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ जिल्ह्यातील जवळपास १५० महिलांनी घेतला आहे. त्यांच्या यादीची पडताळणी होणार आहे. पडताळणीत लाभ घेणाऱ्या महिला आढळल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
….
….
जिल्हा परिषदेतील १५० महिला कर्मचारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. त्याची यादी शासनाने पाठविली आहे. ती यादी प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आली आहे. प्रशासन विभागाकडून यादीतील नावे आणि जिल्हा परिषदेत काम करत असलेल्या महिलांच्या नावाची पडताळणी होणार आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे .
– प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर
…

















