मुंबईतील तीन जागांसह शिवसेना राज्यात लोकसभेच्या १६ जागा लढवणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत स्पष्ट केलं. जागावाटपावरून महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करुन ४२ जागा जिंकण्याचा २०१९ चा विक्रम मोडित काढू, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्यामुळे शिंदेंची शिवसेना भाजपच्या कुठल्या जागेवर दावा सांगणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आतापर्यंत भाजपने ईशान्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दक्षिण मध्य मुंबईत उमेदवाराची घोषणा केली आहे. त्यामुळे महायुतीकडून मुंबईतील तीन जागांवर उमेदवार देणे बाकी आहे. विशेष म्हणजे महायुतीने अधिकृतरित्या जागावाटप जाहीर केलेले नाही. त्यामुळे उर्वरित तीन जागांवर कुठला पक्ष कुठे लढणार हे स्पष्ट झालेलं नाही.
भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या मुंबईतील दोन्ही जागांवर खांदेपालट केलंय. ईशान्य मुंबईत मिहिर कोटेचा, तर उत्तर मुंबईत पियुष गोयल यांना संधी देण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबईतून उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. इथे पूनम महाजन भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. मात्र त्यांना असलेला विरोध पाहता, भाजप मुंबईतील तिसऱ्या खासदाराचा पत्ताही कापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याशिवाय, दक्षिण मुंबईत भाजपने उमेदवार उतरवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांची नावं चर्चेत आहेत. ‘सागर’ बंगल्यावर त्यासंदर्भात खलबतंही झाली. युतीत दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेकडे असतानाही, आणि सध्याचे शिवसेनेचे विद्यमान खासदार (अरविंद सावंत-ठाकरे गटात) असतानाही भाजपने तिथे चाचपणी सुरु केली आहे. शिंदेंच्या दाव्यानुसार शिवसेना तीन जागा लढवणार असेल, तर दक्षिण मुंबई किंवा उत्तर मध्य मुंबई यापैकी एक जागा त्यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेने विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना मैदानात उतरवलं आहे. तर गजानन कीर्तिकर यांच्या उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघातूनही शिवसेना उमेदवार देणार असल्याचं निश्चित मानलं जातं. शिवसेना या जागेसाठी चाचपणी करत असून तिथे शोध सुरु असल्याची माहिती आहे.
महत्त्वाचं म्हणजे, एकनाथ शिंदेंनी आतापर्यंत ११ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. शिंदेंच्या दाव्यानुसार आणखी पाच जागांवर त्यांचे उमेदवार असल्यास, त्यात मुंबईच्या दोन जागांसह ठाणे, पालघर आणि नाशिक या सर्व जागांचा समावेश असेल. त्यामुळे भाजप २७ शिवसेना १६, राष्ट्रवादी ५ असे जागावाटप असेल. भाजपने २६, तर राष्ट्रवादीने पाचही उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे भाजप आता केवळ मुंबईतील उत्तर मध्य आणि दक्षिण पैकी कुठल्याही एकाच जागी उमेदवार देईल.