पंढरपूर – चैत्र पाडव्या निमित्त गुढीला घालण्यासाठी लागणारे साखरेचे हार किंवा गाठी तयार करण्याचे काम येथे युध्दपातळीवर सुरु आहे. साखरेचे हार तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. यामुळे यंदाच्या वर्षी गुढीपाडवा सणासाठी लागणाऱ्या साखरेच्या हाराच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसणार आहे.
येत्या १९ मार्च रोजी चैत्रपाडवा अर्थात गुढीपाडव्याचा सण साजरा होणार आहे. या सणाचे औचित्य साधून शहरातील नागरिक घरावर गुढी उभी करीत असतात. चैत्र पाडव्या दिवशी उभारल्या जाणाऱ्या गुढीस साखरेचा हार घालण्याची परंपरा आहे. तसेच लहान मुले व देवतास देखील साखरेचे हार घातले जातात. यामुळे साखरेच्याहारस किंवा गाठीस चांगली मागणी असते. पंढरपुरात गेल्या महिन्यापासून साखरेचे हार तयार करण्यास सुरुवात झाली आहे. हार तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. यामुळे यंदाच्या वर्षी साखरेच्या हाराच्या किमती २० ते ३० टक्के वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.
सध्या ठोक बाजारात साखरेचे हार ११० ते १३० रुपये किलो दराने विक्री होत आहेत. मात्र बाजारात १५० ते २०० रुपये किलो दराने विक्री होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. साखरेच्या हाराच्या दरामध्ये वाढ झाली असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे दिसून येत आहे.
























