सोलापूर – स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणच्यावतीने एक जबरी चोरी, चार चैन स्नॅचिंग व नऊ बसस्थानकातील चोरीचे असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणून 21 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी दि. 16 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून सोलापूर ग्रामीण जिल्हयातील एस.टी. स्टॅन्ड मध्ये प्रवाशी एस.टी.मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरी होण्याच्या घटना होत असल्याने तसेच जिल्ह्यातील जबरी चोरी, मोटार सायकलवरून येवून गळ्यातील सोन्याचे दागिणे ओढून घेवून जाणारे आरोपी हे गुन्हे करत होते. यामुळे पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी या गुन्ह्यांचे विश्लेषण करून असे गुन्हे उघड आणण्याबाबत आदेशीत केले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशीत करण्यात आले होते.
आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी गुन्हेशाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व पोलीस उपनिरीक्षक कुलदिप सोनटक्के यांचे पथक तयार करुन त्यांना सोलापूर जिल्हयात अशा पध्दतीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणचे सी.सी.टी.व्हि. फुटेज प्राप्त करुन घेवून त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हे उघडकीस आणणेकामी योग्य ते मार्गदर्शन केले होते. त्यातील पोउपनि कुलदीप सोनटक्के यांच्या पथकातील पोकॉ/ प्रमोद शिंपाळे यांनी सी.सी.टी.व्हि. फुटेज प्राप्त करुन घेवून त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी निष्पन्न केले. तसेच पोहेकॉ सलीम बागवान यांनी जिल्हयात घडलेल्या एस.टी. स्टॅन्ड परिसरातील गुन्हयांचे तांत्रिक विश्लेषण करुन माहिती संकलीत केली.
सदरचे पथक हे आरोपींच्या मागावर असताना, गुन्हे शाखेकडील सहा. फौजदार प्रकाश कारटकर, प्रमोद शिंपाळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बीड जिल्हयातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळया सोलापूर जिल्हयात एस.टी. स्टॅन्ड वरील चोऱ्या करण्यासाठी येणार असून पैकी एक टोळी टेंभूर्णी एस.टी. स्टॅन्ड व दुसरी टोळी हे चारचाकी वाहनासह अक्कलकोट शहरातील एस.टी. स्टॅन्ड परिसरात चोऱ्या करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्याबातमीच्या अनुषंगाने अक्कलकोट येथे शोध घेतला असता, बातमी प्रमाणे दोन इसम संशयितरित्या मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नांव व पत्ते विचारले असता, त्यांनी त्यांची नांवे किरण आजिनाथ गायकवाड, वय 25 वर्षे, व राम पांडूरंग दुधाळ वय 25 वर्षे, दोघे रा. हिवरसिंगा ता. शिरुर कासार जि. बीड असे असल्याचे सांगितले.
अक्कलकोट येथे मिळून आलेल्या आरोपीतांकडे सोलापूर ग्रामीण जिल्हयातील एस.टी. स्टॅन्ड परिसरात घडलेल्या चोऱ्यांबाबत कौशल्यपूर्ण तपास करता त्यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयातील वैराग, अक्कलकोट एस.टी. स्टॅन्ड व अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन येथील एस.टी. स्टॅन्ड मध्ये गर्दीचा फायदा घेवून बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गळयातील सोन्याचे दागिने कट करुन चोरी केले असल्याचे सांगितले. त्यावरुन त्या दोन्ही आरोपींना अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुरनं 283/2025 बीएनएस 303(2), 3(5) प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून तपासामध्ये त्यांचेकडून एकूण 08 एस.टी. स्टॅन्ड चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. तसेच टेंभूर्णी एस.टी.स्टॅन्ड परिसरातून संशयितरित्या मिळून आलेल्या 03 इसमांना ताब्यात घेवून त्यांना नांव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नांवे 1) दत्ता उर्फ सोन्या विजय गायकवाड, वय 25 वर्षे, 2) शाम साहेबराव उबाळे, वय 33 वर्षे, रा. गांधीनगर ता. बीड, 3) बाळासाहेब प्रकाश गायकवाड, वय 34 वर्षे, रा. नाळवंडीनाका बीड असे असल्याचे सांगून त्यांनी टेंभूर्णी एस टी स्टॅन्ड येथे एस.टी. स्टॅन्ड येथे चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांना टेंभूर्णी पोलीस ठाणे गुरनं 774/2025 बीएनएस 303(2), 3(5) प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून तपासामध्ये त्यांचेकडून 01 एस.टी. स्टॅन्ड चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर आरोपीतांकडून सोलापूर ग्रामीण जिल्हयातील एकूण 09 एस.टी. स्टॅन्ड चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांचेकडून 110 ग्रॅम वजनाचे 14,30,000 रु. किंमतीचे सोन्याचे दागिने व गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन एमएच 04 एफआर 3833 या एर्टिका 5,00,000 रु. किंमतीचे असा एकूण 19,30,000 रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

























