सोलापूर : महापालिकेच्या मालकीच्या शहरात असलेल्या अनेक गाळेधारकांकडे कोट्यावधी रुपयांची थकबाकी असल्याने महापालिका भूमी व मालमत्ता विभागाकडून कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत विशेष पथकाने सतत लाखो रुपयाचे गाळे भाडे थकीत ठेवणाऱ्या शहरातील विविध भागातील २१ मेजर गाळे सील केले आहे. ८७ गाळेधारकांनी थकीत १ कोटी १४ लाख रुपये भरले आहेत.
महापालिकेच्या गाळेधारकांकडे चालू आर्थिक वर्ष आणि मागील आर्थिक वर्षातील सुमारे ८ कोटी रुपयाहून अधिकची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी यापूर्वी सूट देणारी योजना लागू करण्यात आली होती. यानंतरही अनेक गाळेधारकांची अद्यापही मोठी थकबाकी राहिल्याने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांनी कारवाईचे आदेश भूमी व मालमत्ता विभागाला दिले होते. यापूर्वी मिनी गाळेधारकांकडून मोठी थकबाकी वसूल करण्यात आली होती मात्र मेजर गाळेधारकांची थकबाकी तशीच राहिल्याची ओरड देखील होत आहे.
ही थकबाकी वसूल करण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार दि. ३ नोव्हेंबर पासून कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील विविध भागात असलेल्या महापालिकेच्या मेजर गाळेधारकांकडे एकूण ४ कोटी ५२ लाख ६३ हजार ४२ रुपये इतकी थकबाकी आहे. दि. ३ ते ८ नोव्हेंबर दरम्यान कारवाई मोहिमेत विभागाने २१ गाळेधारकांवर कारवाई करत त्यांचे गळे सील केले. त्यांच्याकडे १ कोटी ३५ लाख १४ हजार ५३ रुपयांची थकबाकी होती. तर कारवाईच्या भीतीपोटी थकबाकी ८७ गाळेधारकांनी आपल्या थकबाकी रकमेतून ८ लाख १ हजार ९९४ रुपये रोख तर १ कोटी ६ लाख ९१ हजार ३१६ रुपयांचे धनादेश असे एकूण १ कोटी १४ लाख ६७ हजार ११० रुपयांचे थकीत भाडे महापालिकेकडे जमा केले.
दरम्यान, ही कारवाई मोहीम यापुढे सुरूच राहणार असून संपूर्ण थकबाकी वसूल करण्यात येणार असल्याचे भूमी व मालमत्ता विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

























