नांदेड – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अर्धापूर हाद्दीत, शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या समोर विरूद्ध दिशेने येणाऱ्या आयचरने एसटी बसला धडक दिली. या अपघातात २२ जण जखमी झाले. तर ७ जण गंभीर आहेत. ही घटना शनिवारी दि. ३० रोजी चार वाजता च्या सुमारास घडली. जखमींवर अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर गंभीर जखमी असलेल्या सात जणांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नांदेड बसस्थानकातून नांदेड सावरगाव ही बस शनिवारी दुपारी प्रवासी घेऊन सावरगाव मार्गे निघाली होती. ही बस अर्धापूर शहरातील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या समोर आली. यावेळी हिंगोलीकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात ट्रक चालक राकेश लवंशी (वय ४२, रा. धार, मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच वसमतफाटा महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शेख नईम, जमादार सचिन खेडकर, राजेश श्रीवास्तव, गजानन डवरे, दत्ता डुकरे आदी घटनास्थली दाखल झाले. वाहतूक सुरळीत केली.
अपघातातील संजय बालाजी मुळेकर (वय ४८, रा सावरगाव), दिलीप कोंडीबा तारू (वय ३०, रा. चाभरा), कोंडीबा गुणाजी तारु (वय ४२, रा. चाभरा), विलास दत्ताप्पा शेवाळकर (वय ५१, रा. चाभरा), बबन गणपती गारोळे (वय ४२, सावरगाव), बालाजी पिराजी धोंगडे (वय ६४, रा. निमगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर भूजंग राजेंद्र गादेकर (वय ४१, रा. सावरगाव), मारोती सखाराम गादेकर (वय ६०, रा. सावरगाव), गुलाब मारोती राठोड (वय ७५), गोदावरी रामा नरवाडे (वय ४६) सारजाबाई उत्तम सुर्यवंशी (वय ६०), सिताबाई रामा ढगे (वय ३५), यशवंत विक्रम जोगदळे (वय ७५), बळीराम पुंजाजी मिरागे (वय ५०), फुलाजी बालाजी दांडेगावकर (वय २६), अंकिता चंद्रकांत सोनाळे (वय १९), इंदुबाई दत्तराव तरटे (वय ६२), विश्वास गुलाबराव जाधव (वय ५०), प्रमोद गणपतराव जोंधळे (वय ४४), श्यामराव किशनराव आडकिने (वय ७५), मारोती घनश्याम बिचकुंदे (वय ७६) हे किरकोळ जखमी झाले. यांच्यावर अर्धापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.