पंढरपूर – पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी आता वातावरण तापू लागलेले आहे. भाजपाकडून नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक लढऊ इच्छिणाऱ्या मंडळींच्या मुलाखती स्वत: जिल्हाचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थिती मध्ये पार पडल्या. दरम्यान भाजपा कडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून आली.
पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक येत्या २ डिसेंबर रोजी होणार आहे. यंदा शहरातील १८ प्रभागातून ३६ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. नगराध्यक्षपदाची निवडणूक ही जनतेतून होणार आहे. यावर्षी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेले आहे. नगरसेवकांच्या एकुण संख्येत ५० टक्के महिलांना संधी ( राखीव जागा ) आहे.
नगरपालिका निवडणूकीसाठी सोमवारी (ता.१०) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. यंदाची निवडणूक भाजपा कडून अधिकृत कमळ चिन्हावरच लढविली जाणार आहे. त्यामुळे भाजपाकडून नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थिती मध्ये घेण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा भाजपा ( उत्तर) चे अध्यक्ष शशिकांत चव्हाण,चेतनसिंह केदार सावंत (सांगोला), पंढरपूर नगरपालिका निवडणूक प्रभारी तथा जिल्हाउपाध्यक्ष प्रणव परिचारक, तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, शहराध्यक्ष लाला पानकर आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक पदासाठी सुमारे २२४ इच्छुकांनी तर नगराध्यक्षपदासाठी ८ इच्छुक महिलांनी मुलाखती दिल्या.
——————-
नगराध्यक्षपदासाठी या महिलांनी दिल्या मुलाखती –
वैशाली सुनील वाळुजकर,साधना नागेश भोसले, सीमा गणेश अधटराव, शामल लक्ष्मण शिरसट ( पापरकर ),प्रतिक्षा विक्रम शिरसट (पापरकर), जयश्री अमोल डोके आणि ज्योती राजीव कटेकर,सौ.मलपे या नगराध्यक्ष पदासाठीच्या इच्छुक असलेल्या महिलांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या मुलाखतीस उपस्थिती लावली.




















