दिल्ली : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक जागृती, मानवी मूल्ये आणि क्रीडाभावनेचा सुंदर संगम साकारत २६व्या बाबा गुरबचन सिंह मेमोरियल क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे अत्यंत श्रद्धामय व अनुशासित वातावरणात संपन्न झाला. ही स्पर्धा केवळ क्रीडास्पर्धा नसून मानवता, एकता आणि सामूहिक प्रगतीचा सशक्त संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम आहे.
२६ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ या कालावधीत आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत देशभरातील २४ अव्वल संघ सहभागी झाले आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, जम्मू, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, ओरिसा, कोलकाता, गुजरात, दिल्ली व दिल्ली एनसीआर येथील युवा खेळाडू शिस्त, संयम आणि बंधुभाव यांचे उत्तम दर्शन घडवीत आहेत. मैदानावरील त्यांची निष्ठा, मर्यादित आचारसंहिता आणि सेवाभाव या स्पर्धेला प्रेरणेचा उत्सव बनवित आहेत.
या भव्य आयोजनाचे कुशल नियोजन संत निरंकारी मंडळाचे सचीव श्री जोगिंदर सुखीजा यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे. युवकांमध्ये स्पर्धेबाबत प्रचंड उत्साह असून मोठ्या संख्येने नोंदणी झाल्याची माहिती त्यांनी दिली. ही स्पर्धा केवळ क्रीडागुणांना वाव देत नाही, तर आत्मसंयम, ऐक्यभाव आणि आध्यात्मिक जाणीव अधिक दृढ करते.
या स्पर्धेची सुरवात बाबा हरदेव सिंहजी यांनी बाबा गुरबचन सिंहजी यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ केली होती. युवकशक्तीला संयम, शिस्त आणि सेवाभावाच्या मार्गावर प्रेरित करण्यासाठी क्रीडा हे प्रभावी माध्यम असल्याचा बाबा गुरबचन सिंहजीचा दृढ विश्वास होता.
या शुभारंभ प्रसंगी श्रीमती राजकुमारीजी ,प्रधान-संत निरंकारी मंडळ तसेच केंद्रीय योजना आणि सल्लागार समितीचे उपाध्यक्ष श्री नरेंद्र सिंहजी यांची विशेष उपस्थिती लाभली. यांच्या सोबत मंडळाच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
या प्रसंगी खेळाडूंना आशीर्वचन देताना श्रीमती राजकुमारीजी यांनी सांगितले की, २६वी ही स्पर्धा सन २००० मध्ये लुधियाना येथून प्रारंभ झाली असून २०२१ नंतरही त्याच उद्देशाने अखंडपणे सुरू आहे. बाबा गुरबचन सिंहजीच्या मतानुसार, “शरीर निरोगी असेल तरच खरी भक्ती साध्य होऊ शकते,” कारण मानवदेह हा परमात्मप्राप्तीचे साधन आहे. खेळ आपल्याला कोणतीही परिस्थिती असो, मनःस्थिती संतुलित ठेवण्याची आणि विजय-पराजयापलीकडे जाऊन प्रेम, नम्रता व बंधुभाव जपण्याची शिकवण देतात. निरोगी शरीरामुळेच आपण सेवाकार्यात योगदान देऊ शकतो आणि भक्तीत आनंद अनुभवू शकतो. खेळामुळे सहनशीलता, मर्यादा आणि शिस्त यांसारखे गुण विकसित होतात. “थकायचे नाही, अहंकार बाळगायचा नाही, झुकायचे नाही” या भावनेने निरंकार चरणी प्रार्थना आहे की सर्वजण निरोगी राहोत, क्रीडाभावनेने पुढे जावोत आणि प्रेम व आनंदाने जीवन व्यतीत करो.
स्पर्धेचे सुरळीत व यशस्वी आयोजन होण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. सहभागी खेळाडू व प्रेक्षकांच्या सोयीसाठी निवास, वैद्यकीय सेवा, अल्पोपहार, आपत्कालीन मदत, सुरक्षा व्यवस्था तसेच वाहनतळ यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे हा उपक्रम सुव्यवस्थित, संस्मरणीय आणि यशस्वी ठरत आहे.
ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून युवकांसाठी आत्मिक जागृती व जीवनमूल्यांच्या संवर्धनाची अनोखी संधी आहे. दररोज सायंकाळी आयोजित सत्संग कार्यक्रमांमुळे युवकांना मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि चेतनेच्या उन्नतीची प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे ते क्रीडेसह जीवनातील खरे ध्येय प्राप्त करू शकतील.
निःसंशयपणे, सतगुरूंच्या दिव्य मार्गदर्शनाखाली आयोजित बाबा गुरबचन सिंह मेमोरियल क्रिकेट स्पर्धा क्रीडाभावनेसह मानवएकतेचे आदर्श दृढ करत समाजाला सकारात्मक दिशा देणारी ठरत आहे.

























