नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दि. ४ ते ८ डिसेंबर २०२५ दरम्यान २७ वा महाराष्ट्र राज्य अंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या भव्य क्रीडा महोत्सवासाठी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या स्थापन करून तयारी जोरात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आज दि. २८ नोव्हेंबर रोजी मा. राज्यपाल नियुक्त मा. राजभवन स्पर्धा परीक्षा निरीक्षण समितीने विद्यापीठाच्या क्रीडा सुविधांचे निरीक्षण केले. समितीने विविध विभागांकडून अद्यावत माहिती घेत संपूर्ण तयारीचे परीक्षण केले. या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून दापोली येथील डॉ. अरुण माने, तर सदस्य म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सचिन देशमुख आणि मुंबई येथील आदित्य कुलकर्णी उपस्थित होते.
विद्यापीठातील क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी समितीसमोर क्रीडा महोत्सवाच्या तयारीचा विस्तृत आढावा सादर केला.
या क्रीडा महोत्सवात कब्बडी, खो-खो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ आणि ॲथलेटिक्स यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांचा समावेश असून, राज्यभरातील विद्यापीठांमधून अंदाजे ५००० खेळाडू सहभागी होणार आहेत. अशा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत कुलगुरू डॉ. चासकर आणि क्रीडा संचालक डॉ. माने यांनी व्यक्त केले आहे.
क्रीडांगणे अद्ययावत करण्यासाठी कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर यांच्यासह डॉ. मनोज पैजने, हिरामण वाघमारे, राजासाहेब बोराळे, अरुण इंगोले, केशव कल्याणकर, प्रदीप बिडला तसेच विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी परिश्रमपूर्वक कार्यरत आहेत.


















