जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे अभुतपूर्व नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या महायुती सरकारने जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी १८९ कोटी यापूर्वीच उपलब्ध करून दिले आहेत. त्याचे वितरणही युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील २९२ कोटी रुपयांच्या मंजुरीचा शासन आदेशही निघाला आहे. ही रक्कमही बाधित शेतकरी बांधवांच्या खात्यात तातडीने वितरित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. खरवडून गेलेल्या जमिनीसाठी ४० कोटी रुपयांचा शासन आदेश आज निर्गमित होणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त दोन हेक्टरपेक्षा अधिक तीन हेक्टर पर्यंत ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना दिवाळीनंतर तिसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी आपल्या महायुती सरकारने १८९ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्याचे वितरणही सुरू आहे. अद्यापही काही ठिकाणी ही रक्कम प्राप्त झाली नसल्याच्या तक्रारी आपल्यापर्यंत येत आहेत. मात्र जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी अस्वस्थ होऊ नये आणखी वितरण प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच रक्कम आपल्या थेट खात्यात जमा होणार आहे. या पहिल्या मदतीच्या टप्प्यापाठोपाठ सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी दुसरा टप्प्यातील मदतीचे वितरणही आता लवकरच सुरू होईल. त्यासाठी गुरुवारी २९२ कोटी ४९ लाख २१ हजार ४६० रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय निघाला आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे तीन लाख ११ हजार २९१ हेक्टर २३ आर एवढे क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे चार लाख चार हजार ६५६ शेतकरी बांधवांना त्याचा फटका बसला आहे. त्यांना या नैसर्गिक संकटाच्या जोखडात बाहेर काढण्यासाठी २९२ कोटी ४९ लाख २१ हजार ४६० रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून १३ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला होता. तातडीने या सगळ्या बाबींचा पाठपुरावा करून काल १६ ऑक्टोबर रोजी म्हणजे तीन दिवसात आपण शासन आदेश काढून २९२ कोटी रुपयांच्या मदतीचा दुसरा टप्पा मंजूर करवून घेतला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात जिल्ह्यात महापुरामुळे शेतजमीन खरवडून जाणे, जमीन खचणे, नदीपात्रातील जमीन वाहून जाणे आणि गाळ साचणे हे सगळे नुकसान भरून काढण्यासाठी ४० कोटी ४८ लाख दोन हजार ३५० रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे. जिल्ह्यातील ३३ हजार २६३ शेतकरी बांधवांचे आठ हजार ७७४ हेक्टर ४५ आर एवढ्या क्षेत्राला फटका बसला आहे. त्यासाठी आपल्या महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ( खरडून गेलेल्या जमिनीसाठी रु.४७ हजार हेक्टर प्रमाणे व जमिनीत वाळूचा,गाळाचा ३ इंच थर जमा झाला असेल त्यासाठी रु.१८००० प्रति हेक्टर ) ४० कोटी ४८ लाख दोन हजार ३५० रुपयांच्या अनुदान मंजुरीचा शासन निर्णय आज अपेक्षित आहे. त्याव्यतिरिक्त रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या सगळ्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी प्रति हेक्टर तीन लाख रुपये याप्रमाणे साधारणतः २७० कोटी रुपये आपल्या जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहेत. आपण यापूर्वीच ७५० कोटी रुपयांपेक्षा अधिकची मदत आपल्या जिल्ह्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपलब्ध करुन देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १८९ कोटी, गुरुवारी मंजूर झालेले २९२ कोटी आज अपेक्षित असलेल्या शासन निर्णयानुसार ४० कोटी आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुमारे २७० कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच दोन हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झालेल्या तीन हेक्टर क्षेत्रापर्यंतचे अनुदानही दिवाळीनंतर मिळणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.