सोलापूर : केंद्र शासनाच्या योजनेतून सोलापूर शहरासाठी 100 ई बस मंजूर झाल्या आहेत. येत्या जानेवारी महिन्यात सोलापूर शहरात सुमारे 30 ई बस धावणारअसून त्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत या दोन महिन्यात चार्जिंग सेंटरचे काम पूर्ण होणार आहे. डेपोसह चार्जिंग सेंटर बांधणी करिता 27 कोटीचा खर्च होत आहे.
सोलापूर शहरासाठी केंद्र सरकारकडून 100 ई बस मंजूर झाल्या आहेत. येत्या जानेवारीमध्ये शहरात ई बस धावण्यास सुरुवात होणार आहे. न्यू बुधवार पेठ येथील महापालिकेच्या जुन्या बस डेपोच्या जागेवर 27 कोटी रुपये खर्चून बस डेपो आणि चार्जिंग सेंटर बांधले जात आहे. चार्जिंग सेंटरचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे.
चार्जिंग सेंटरसाठी वीज उपकेंद्र करण्यात येणार आहे. यासाठी एकूण चार हजार चौरस मीटर जागा नियोजित केली आहे. हे उपकेंद्र 33 बाय 11 केव्ही आणि दहा एमव्हीए क्षमतेचे राहणार आहे. त्यासाठी 9 कोटी 86 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच सिव्हिल वर्क म्हणजेच इतर पायाभूत सुविधांसाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याचेही काम सुरू करण्यात आले आहे. तीन कोटी रुपये खर्चातून विजेची लाईन टाकण्याचे काम करण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरही बसविले जात आहे. या ठिकाणी सुरुवातीला सुमारे 30 चार्जिंग पॉइंट उपलब्ध केले जाणार आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तशा सूचनाही संबंधित मक्तेदारास देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात येणाऱ्या 30 ई बसेस साठी आवश्यक ती तांत्रिक यंत्रणा उपलब्ध करण्यात येत आहे.
दरम्यान, आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून टप्प्याटप्प्याने या 100 ई बसेस येणार आहेत. सोलापूर शहरातील रस्त्याचा अभ्यास करूनच आवश्यकतेनुसार कमी आकाराच्या या बसेस घेण्यात येणार आहेत. या नव्या बस खरेदीसाठी नोव्हेंबरमध्ये करार करण्यात येणार आहे. त्यानंतर तीन महिन्यात या बसेस उपलब्ध होतील. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करून जानेवारीत नव्या वर्षात सोलापूर शहरात या नव्या बसेस दाखल होतील.




















