वादळी बर्फवृष्टी दरम्यान सोमवारी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप झाला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बर्फवृष्टी होत असताना कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. त्यांचं हे बर्फवृष्टी दरम्यान सुरु असलेलं भाषण पाहून अनेक नेटकऱ्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भर पावसात केलेल्या भाषणाची आठवण झाली. समारोप सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ”येथे तैनात असलेल्या सीआरपीएफ, बीएसएफ आणि लष्कराच्या जवानांना सांगू इच्छितो की मला हिंसा काय असते हे समजतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि आरएसएसचे लोक हे समजू शकत नाहीत. आम्ही इथे चार दिवस फिरलो. भाजपचा कोणताही नेता असा येथे चालणार नाही, याची मी खात्री देतो. जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत म्हणून नाही, तर ते घाबरले आहेत.
राहुल गांधी म्हणाले की, “जेव्हा मी 14 वर्षांचा होतो आणि शाळेत भूगोलाच्या वर्गात बसलो होतो, तेव्हा माझे एक शिक्षक जवळ आले आणि म्हणाले की तुम्हाला मुख्याध्यापकांनी बोलावले आहे. मी मुख्याध्यापकांकडे पोहोचलो तेव्हा त्यांनी सांगितले की, घरून फोन आला आहे. मी फोन घेतला आणि फोनवर बोललो तेव्हा माझ्या आईसोबत काम करणारी बाई जोरात ओरडली, राहुल… आजीला गोळी लागली आहे.” याबाबत बोलताना ते पुढे म्हणाल, ”मी हे जे बोलत आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना समजणार नाही. पण काश्मीरचे लोक, आर्मी आणि सीआरपीएफचे लोक ते समजू शकतात. पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या मुलांना काय वाटत असेल. येथे काश्मिरी लोक मारले जातात, तेव्हा काय वाटत असेल, हे मला आणि माझी बहिणीला चांगलं समजतं.”