बार्शी – बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने वाहन चोरीच्या एका गुन्ह्याचा तपास करताना आंतरजिल्हा स्तरावरील वाहन चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण सात वाहने (सहा ट्रॅक्टर, एक मोटारसायकल आणि एक ब्लोअर) असा सुमारे ३२ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन दोन आरोपींना अटक केली आहे.
बार्शी शहरातील नायकवडी प्लॉट, उपळाई रोड येथील फिर्यादी यांची हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल १३ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांच्या घरासमोरुन चोरीला गेली होती. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८४१/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता (BNS) कलम ३०३ (२) अंतर्गत १६ ऑक्टोबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/४८८ प्रविण साठे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री पोसई उमाकांत कुंजीर, पोहेकॉ ४८८ प्रविण साठे, पोहेकॉ १६६७ अमोल माने, पोकॉ १८६० अजीज शेख, पोकों १९७४ सचिन देशमुख, पोकाॅ २०० राहुल उदार आणि पोकों २१११ अंकुश जाधव यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरु केले. याच दरम्यान रात्रीच्या सुमारास गाडेगाव चौकात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या ट्रॅक्टरसह उभी असलेली आढळली. त्या व्यक्तीकडे विचारणा केली असता, त्याने आपले नाव वैभव ज्ञानेश्वर फंड (वय २९ वर्षे, रा. सावरगाव काठी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे सांगितले. त्याच्याकडील ट्रॅक्टरबाबत विचारणा केली असता, त्याने सदर ट्रॅक्टर माळुंब्रा (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथून आपला मित्र संजय जगन्नाथ शिरगिरे याच्यासह चोरी केल्याचे कबूल केले. पुढील चौकशीत त्याने आणि त्याच्या मित्राने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी बार्शी शहरातील उपळाई येथून एक मोटारसायकल तसेच धामणगाव, राळेरास, मुंगशी (ता. बार्शी) आणि माळुंब्रा (ता. तुळजापूर) येथून एकूण सहा ट्रॅक्टर आणि एक ब्लोअर चोरी केल्याची कबुली दिली.
या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एकूण ६ कुबोटा ट्रॅक्टर, १ ब्लोअर आणि १ मोटारसायकल असा सुमारे ३२ लाख ३० हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्याशी संबंधित खालील पोलीस ठाण्यांमध्ये फिर्यादी दाखल आहेत.
१) तामलवाडी पोलीस ठाणे, जि. धाराशिवः गु.र.नं. १४४/२०२५ आणि गु.र.नं. ४१/२०२५, BNS कलम ३०३
२) वैराग पोलीस ठाणे, जि. सोलापूरः गु.र.नं. 223/2025 आणि गु.र.नं. 249/2025, BNS कलम 303 (2)
३) सोलापूर तालुका पोलीस ठाणे, जि. सोलापूरः गु.र.नं. 425/2025, BNS कलम 303(2)
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रियत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी पार पडली. यात पोसई उमाकांत कुंजीर, अमोल माने, प्रविण साठे, बाळकृष्ण डबडे, अजीज शेख, सचिन देशमुख, अंकुश जाधव, राहुल उदार, पवार, सचिन नितनाथ, बहिरे, उघडे, भांगे, जाधवर आणि चालक मस्के यांनी मोलाची कामगिरी बजावली. पुढील तपास प्रविण साठे करत आहेत.


















