मोडनिंब – महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉमचे ३५ वे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे दिनांक ८ व ९ मार्च रोजी उत्साहात संपन्न झाले.या अधिवेशनातून ज्येष्ठ नागरिकांनी प्रेरणा घेऊन भविष्यात वाटचाल करण्यासाठी उत्कृष्ट वैयक्तिक आणि सांघिक पुरस्कार देण्यात आले .
यावेळी राज्यास्तरीय उत्कृष्ट प्रादेशिक विभाग म्हणून पुणे प्रादेशिक विभागास जाहीर करण्यात आला.महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागास उत्कृष्ट प्रादेशिक विभाग पुरस्कार देण्यात आला. सदरचा पुरस्कार फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष हनुमंत कुंभार, उपाध्यक्ष आयुब इनामदार, सचिव एकनाथ वाळुंज यांनी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पाटील ,फेस्कॉम महाराष्ट्राचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे माजी अध्यक्ष अरुण रोडे,मुख्यसचिव चंद्रकांत महामुनी , मुख्यालय उपाध्यक्ष विवेक देशपांडे, राज्य महिला आघाडी प्रमुखनिर्मला कोरे,अधिवेशनाचे आयोजक नाशिक विभागाचे अध्यक्ष अशोकनाना होळकर, सचिव धनंजय चतुर व अन्य पदाधिका-यांच्या उपस्थितीत स्विकारला.
फेस्कॉमच्या अधिकृत उद्दिष्टानुसार पुणे प्रादेशिक विभागाने यापूर्वी विविध उपक्रम राबवून सर्वच बाबतीत राज्यात सतत आघाडीवर राहिलेला आहे.मोफत होमिओपॅथिक दवाखाना,मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र व समुपदेशन केंद्र, विरंगुळा केंद्र, विविध प्रकारची शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, राज्यस्तरीय व प्रादेशिक अधिवेशन, महिला मेळावा, कार्यशाळा, आरोग्य शिबीरे ,शासकीय लाभांच्या योजनांची प्रभावी कार्यवाही. प्रादेशिक वार्तापत्र, पेपरलेस कामकाज, पुस्तक विक्री व अन्य सामाजिक उपक्रम इत्यादी प्रभावी अंमलबजावणी केली जाते. सांघिक कामगिरीमुळे सलग दोन वेळा हा पुरस्कार मिळाल्याचे अध्यक्ष कुंभार व उपाध्यक्ष इनामदार यांनी सांगितले.पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.


























