बार्शी – श्रीपतपिंपरी गावात दिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी हनुमंत बाबूराव घाडगे (वय ५४) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून प्रवेश करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे ३ लाख ९६ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
फिर्यादी हनुमंत घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ते आपल्या कुटुंबासह बार्शी येथे मामाच्या मुलीच्या लग्नासाठी गेले होते. त्यांनी घराला कुलूप लावून विठाई मंगल कार्यालय, बार्शी येथे कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
दुपारी अंदाजे ३ वाजता घरी परतल्यावर मुख्य दरवाजा उघडा आणि कडी-कोयंडा तुटलेला दिसला. घरात प्रवेश केला असता लोखंडी कपाट उघडे व आतले सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे आढळले.
चोरट्यांनी दोन पाटल्या, २ तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट, अर्धा तोळा वजनाचे लॉकेट, अंगठी, कानातील रिंगा, झुबे, नथ आणि रोख रक्कम १६ हजार रुपये असा एकूण अंदाजे ३,९६,००० रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. या घटनेची बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस तपास सुरच आहे.



















