मुंबई: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागातील ४७अधिकाऱ्यांसाठी मोठी ‘दिवाळी भेट’ जाहीर केली आहे. गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नत्यांचा मार्ग मोकळा करत, राज्याला आता ४७ नवे अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत.दिवाळीच्या पहिल्याच दिवशी याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला.
सामान्य प्रशासन विभागाने 15 ऑक्टोबर रोजी दिलेल्या इतिवृत्तानुसार, आस्थापना मंडळ (क्रमांक 2) ने अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांची निवडसू वर्ष 2025-26 साठी तयार केली. त्यानुसार, अपर जिल्हाधिकारी (गट-अ (वेतनश्रेणी एस 25-1 78,800 – 2,09,200/-) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) (गट-अ) (वेतनश्रेणी एस 27-11,23,100-2,15,900/-) या संवर्गात तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती देण्याची शिफारस करण्यात आली होती.
आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार ही निवडसूची २०२५-२६ साठी तयार करण्यात आली होती. या पदोन्नत अधिकाऱ्यांना ३० दिवसांच्या आत नवीन पदावर रुजू होणे बंधनकारक आहे. या मुदतीत रुजू न झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाइ केली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
रुजू झाल्याचा अहवाल revenue@maharashtra.gov.in वर त्वरित कळवावा लागणार आहे. या घोषणेपूर्वी महसूलमंत्री बावनकुळे यांनी सुमारे १६०० अधिकारी-कर्मचाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
महसूल विभाग अधिक जनताभिमुख, पारदर्शी आणि कार्यक्षम व्हावा, असे आवाहन करत त्यांनी ‘दीपपर्वा’च्या निमित्ताने या कार्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.