सोलापूर : शहरातील जोडबसवण्णा चौकात बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणाऱ्यास महापालिकेकडून 50 हजारांचा दंड करण्यात आला आहे.
महानगरपालिका घन कचरा विभाग व आरोग्य विभागाच्या निरीक्षणादरम्यान शहरातील जोडबसवण्णा चौक परिसरात बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर फेकल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
संबंधितांनी त्यांच्या मेडिकलमधील बायोमेडिकल कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याचे महापालिका अधिकाऱ्यांच्या पाहणीत आढळून आले.
या घटनेबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाल्याने महानगरपालिकेने तात्काळ कारवाई केली आहे. संबंधित व्यक्तीवर पर्यावरण (संरक्षण) कायदा, कलम १५ नुसार 50 हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.
बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकल्यास त्याचा सार्वजनिक आरोग्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन महापालिकेच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई : आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे
याबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी म्हटले आहे की, नागरिकांना तसेच सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी बायोमेडिकल कचरा ही अतिसंवेदनशील आणि नियमबद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. शहर स्वच्छ, निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व वैद्यकीय प्रतिष्ठानांनी नियमावलीचे पालन करावे. शहरात कुठेही बायोमेडिकल वेस्ट कोणी टाकत असेल तर नागरिकांनी त्वरित महापालिकेचे आरोग्य निरीक्षक तसेच आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांना संपर्क करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.




















