मुंबई – १९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या आणि वृत्तपत्र लेखन चळवळ यंदा ७६ वर्ष साजरे करीत आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ५० वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने १९७६ पासून मराठी भाषेची वैभवशाली दिवाळी अंक प्रदर्शन परंपरा जपली जाते आहे. या उपक्रमात गोरेगाव येथील मराठी विचारधारा प्रतिष्ठान ही संस्था दरवर्षी प्रमाणे सहभागी होत आहे.
या मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही अंक येत असतात. सर्वोत्कृष्ट अंकासाठी मनोरंजनकार का र मित्र स्मृती पुरस्कार तर आवाजकार मधुकर पाटकर पुरस्कृत सर्वोत्कृष्ट विनोदी अंक, साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक, सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक, मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित सर्वोत्कृष्ट अंक, कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट दिवाळी अंक, पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती उत्कृष्ट अंक, मनोहरपंत चिवटे स्मृती सर्वोत्कृष्ट आरोग्य विषयक अंक यासह स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या अंकांचा उत्कृष्ट आणि उल्लेखनीय अंक म्हणून पारितोषिक देऊन मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येतो. स्पर्धा व प्रदर्शनासाठी आलेले हे अंक मुंबई-ठाणे शहरात प्रदर्शन आयोजित करून मांडले जातात.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी “जागल्यांचा लोकजागर” या ब्लॉगवरून दिवाळी अंकांचे परीक्षण प्रसिद्ध करण्यात येणार आहे तसेच गेल्या ५० वर्षातील यावर्षापर्यंत प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांची संपर्क सूची मराठी भाषा दिवस साजरा करताना प्रकाशित करण्यात येणार आहे, हे अंक ग्रामीण भागातील शाळा-वाचनालयांना मोफत दिले जातात.
दिवाळी अंकांच्या संपादक-प्रकाशकांनी २ प्रती – रवींद्र मालुसरे, अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, घरकुल सोसायटी, रूम न. ६१२, ६ वा मजला, सेंच्युरी बाजार लेन, भुस्सा इंड. समोर, प्रभादेवी, मुंबई – ४०० ०२५ येथे पाठवाव्यात. असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रवींद्र मालुसरे ९३२३११७७०४ आणि सुनील कुवरे ९१६७३६४८७० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.