सोलापूर : महापालिका आयुक्तांनी आज या ५४ मीटर रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्याची सध्याची स्थिती, कामाचा वेग, मुरूम व डांबरीकरणाची प्रगती याबाबत माहिती घेत रेल्वे ब्रिज पाडण्यापूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरु करावा. कामात कोणताही विलंब होऊ नये, गुणवत्ता आणि सुरक्षा निकष पाळून कामे तातडीने पूर्ण करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कंत्राटदारास दिले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते दमाणी नगरदरम्यान असलेला १०३ वर्षे जुना ब्रिज पाडण्यात येणार असून, ब्रिज पाडण्यापूर्वी नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी आवंतीनगर परिसरामध्ये ५४ मीटर रुंदीचा नवीन रस्ता तयार करण्यात येत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा भार कमी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असून, त्यानुसार आज महापालिका आयुक्तांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.
यावेळी नगर अभियंता सारिका आकूलवार, नियंत्रण अधिकारी तपन डंके, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, प्रकाश सावंत, विभागीय अधिकारी सरकाझी, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार,सह. अभियंता प्रकाश दिवाणजी, सागर करोसेकर आदी उपस्थित होते.
यानंतर आयुक्तांनी विष्णू चाळ येथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली. स्वच्छता, व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि वापरातील सुविधा या संदर्भात काही सुधारणा आवश्यक असल्याचे दिसून आले. त्यावर तत्काळ आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
दहिटणे गाव येथील जुने शौचालय काम पूर्ण झाले असून त्या सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली. कामाची गुणवत्ता, स्वच्छता व्यवस्था आणि नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.
पर्यायी मार्गांवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात दिल्या सूचना
पर्यायी मार्ग म्हणून निश्चित करण्यात आलेल्या डोणगाव रोडची देखील आयुक्तांनी पाहणी केली. काही ठिकाणी रस्त्याच काम सुरु असून ते लवकर पूर्ण करण्याचे सूचना दिल्या तसेच आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती आवश्यक असल्याचे निदर्शनास आले असून, रस्ता वाहतुकीस सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देश दिले. पर्यायी मार्गांवरील लाईटचे पोल शिप्ट करणे आणि अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना दिल्या.
















