सोलापूर : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक (जुने भैय्या चौक) ते मरिआई चौक दरम्यान असलेला थांबा पूल पाडण्यात आल्यामुळे भैय्या चौकातील एस.टी. थांबा बंद झाला आहे. त्यामुळे देगाव, बसवेश्वर नगर, दमाणी नगर, देशमुख पाटील वस्ती, हौसे वस्ती या भागातील नागरिकांना एस.टी. पकडण्यासाठी मुख्य स्थानकावर जावे लागत असून, त्यांना अनावश्यक अंतर व खर्च सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ५४ मीटर रस्त्यावर देशमुख पाटील वस्ती येथे नवीन एस.टी. थांबा देण्यात यावा, अशी मागणी एकात्मता बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिन शिराळकर यांनी विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या परिसरातून तिहे, हिरज, कामती, शिंगोली, डोणगाव, तसेच मिरज, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने थांबा मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी हर्षल साबळे, मुन्ना वाघमारे, हृतिक कसबे आदी उपस्थित होते.






















